केडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाची सुरुवात

डोंबिवली, ता. 13 (प्रतिनिधी)

ऊर्जा बचत ही काळाची गरज असून, ती साध्य करण्यासाठी आपल्या स्वभावात बदल होणे अत्यावश्यक आहे, असे मत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) विद्युत विभागाच्या पुढाकाराने आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभी कार्यक्रमात ते बोलत होते.

संपूर्ण देशात 14 डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच, 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताह पाळला जातो. याच अनुषंगाने, केडीएमसीच्या विद्युत विभागाने ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी या सप्ताहाचे आयोजन केले आहे.

   यंदाच्या कार्यक्रमात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऊर्जा बचतीच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना सांगण्यात आले की, लहान-सहान कृतींमधूनही आपण ऊर्जा बचत साध्य करू शकतो. यासाठी, विद्युत विभागाने तीन माहितीपत्रके तयार केली आहेत, ज्यामध्ये ऊर्जा बचतीचे मार्ग, बीईई स्टार मानांकित ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर, आणि सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी लागणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या क्रमांकांचा समावेश आहे.कार्यक्रमादरम्यान, केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा संवर्धनाच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, “आपले घर किंवा सार्वजनिक ठिकाण असो, वातानुकूलित यंत्रणेसाठी सर्वाधिक वीज वापरली जाते. आवश्यकता नसताना वीज उपकरणे बंद ठेवून ऊर्जा बचतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.” यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातील वीजपुरवठा बंद करून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

    ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने पुढील आठवडाभर केडीएमसी विद्युत विभाग विविध गृहसंकुले, सार्वजनिक ठिकाणे आणि महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचत आणि जबाबदार वीज वापर याबाबत जनजागृती करणार आहे.कार्यक्रमादरम्यान, केडीएमसी विद्युत विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी पुस्तिकेचे स्वागत करत ऊर्जा संवर्धन उपक्रमांना पाठिंबा दर्शवला.

  कार्यक्रमास केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, प्रसाद बोरकर, अतुल पाटील,शहर अभियंता अर्चना परदेशी, केडीएमसी ब्रँड ॲम्बेसेडर व महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, मुख्य लेखा परीक्षक पाटील, मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण, न्यू रोटरी क्लब कल्याणचे बिजू उन्नीथन, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उप अभियंता भागवत पाटील, जितेंद्र शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ऊर्जा बचत हे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही, तर पर्यावरणीय शाश्वततेसाठीही महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये ऊर्जा बचतीबाबत सकारात्मक जनजागृती होण्यास मदत होईल.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!