कल्याण: ता:09 ;( प्रतिनिधी):-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीची संधी दिली असून २४ तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख दुःखात धावून येणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुरोहितांनी केलेल्या मंत्रोच्चारामुळे इथले वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रवी पाटील, जितेन पाटील, भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, माजी उप-महापौर मोरेश्वर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. ब्रह्मा माळी, महिला आघाडीच्या प्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक अर्जुन पाटील, शैलेश पाटील, यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, आमदार म्हणून निवडून आल्यावरही आपली कार्यपद्धती त्याच प्रकारे राहणार आहे, असे सांगून राजेश मोरे यांनी लोकांना आश्वासन दिले की, त्यांना भेटण्यासाठी कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाही. राजेश मोरे याना हात दिखाव गाडी रुकाव याच विचाराला पाठिंबा देत खासदार डॉ. शिंदे यांनी मोरे यांचे कौतुक केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपल्याला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो २४ तास उपलब्ध राहील आणि लोकांच्या सुख-दुखात धावून येईल.
” राजा का बेटा राजा नाही बनेगा” या विचारधारेनुसार, महाराष्ट्रात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा ध्यास असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश मोरे यांना संधी दिल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि उत्साह वाढला आहे. आपण सर्वांना एकत्रित घेऊन विकासाची वाटचाल करत आहोत, आणि महायुतीतील सर्व कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, असे सांगत शिंदे यांनी यावेळी महायुतीच्या सर्व जागा १०० टक्के जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
—–