मुंबई : कामगारांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नये. सरकार औद्योगिक सुरक्षेसंबंधी कायदे अधिक कडक करण्यासाठी व सुरक्षा उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारताच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचे महत्त्व अधोरेखित केले.
एक्स्ट्रीमस सेफ्टी प्रा. लि.च्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित वैयक्तिक सुरक्षा उपकरण प्रणालीचे सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कंपनीच्या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सर्व उद्योगांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे, उत्तम सुरक्षा उपाय राबविण्यासह प्रत्येक कामगाराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले. कंपनीच्या प्रणालीमुळे वास्तविक वेळेत धोका ओळखणे, स्मार्ट मॉनिटरिंग आणि संभाव्य अपघातांचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांना सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध होणार आहे.