डोंबिवली : भाजपची आरपीआय आठवले गटासोबत युती असतानाही भाजपकडून कार्यक्रमांमध्ये आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना डावलले जाते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे फोटो लावले जात नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मान मान दिला जात नाही. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडल्यास भाजपच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आठवले गटाच्या उमेदवारांना संधी दिली नाही तर भाजपचा उमेदवार पाडू असा इशारा आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी कल्याणात दिला. आरपीआय आठवले गटाचा कल्याण मधील अत्रे रंगमंदिरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजप बद्दल नाराजी व्यक्त केली.

या कार्यकर्ता मेळाव्याल मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर म्हणाले, गेल्या नऊ दहा वर्षापासून आरपीआय आठवले गट व भाजपची युती आहे. मात्र भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले नाही. भाजपच्या होणाऱ्या कार्यक्रमांमधील बॅनरवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा फोटो देखील जात नाही. आठवले गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाहीत. युती असली तरी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जात नाही. इथून पुढे जर भाजपाने मानसन्मान दिला नाही तर भाजपच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिला. पुढे बोलताना बहादुरे यांनी येणाऱ्या लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकांमध्ये आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि सन्मान दिला तरच भाजपला निवडून आणा असा इशारा भाजपाला दिला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा विरोधात नाराजीचा सूर लगावला. दरम्यान कार्यक्रमात आरपीआय पक्षातील कल्याणचे स्थानिक जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव आणि जेष्ठ नेते अण्णा रोकडे या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून त्यांच्यातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आणला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *