नारायण राणेंच्या रिक्त जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन विधान परिषदेच्या आमदारकिचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या या जागेसाठी ७ डिसेंबर २०१७ रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेसला कंटाळून राणे यांनी राजीनामा देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलीय. राणेंच्या भाजपाच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करून एनडीएला पाठींबा जाहिर केलाय. शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर राणे हे काँग्रेसमध्ये दाखल झाले मात्र १२ वर्षानंतर त्यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकलाय. विधान परिषदेच्या आमदारकिची टर्म ही ७ जूलै२०२२ पर्यंत आहे. या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार असून मतमोजणी त्याच दिवशी पार पडणार आहे. २७ नोव्हेंबरला नामनिर्देशनाची अंतिम मुदत असून २८ नोव्हेंबरला अर्जाची छाननी तर ३० नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.