वासिंद (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा सल्लागार वासिंद चे माजी सरपंच विठ्ठल भेरे यांचे शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले वासिंद मधील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपला अशा भावना वासिंद मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
वासिंदचे माजी सरपंच ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे.वासिंदच्या राजकीय घडामोडींवर त्यांची चांगली पकड होती.यामुळे अनेक स्थानिक ग्रामपंचायत,सहकारी संस्था, जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका असोत यामध्ये विठ्ठल भेरे यांनी सहभाग घेतल्यानंतर या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलून भेरे हे आपली राजकीय ताकद व कसब पणाला लावीत एकहाती सत्ता काबीज करण्यात नेहमी यशस्वी होत असत असे राजकीय डावपेच असलेले धूरंधर नेते म्हणुन त्यांची शहापूरसह ठाणे जिल्हयात ओळख होती.वासिंद चे राजकारण गेली ३५ वर्ष विठ्ठल भेरे या एकाच नावा भोवती फिरत होते असे बहुआयामी,अष्टपैलू ,राजकारणी असा ठसा त्यांनी उमटविला होता.सुरवातीच्या काळात काँग्रेस,नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रामाणिकपणे काम करीत पक्ष निष्ठा टिकवली काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक पद भुषविली नंतर त्यांनी राजकीय चढाओढीच्या व पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.वासिंद येथील सरस्वती विद्यालय या शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते या संस्थेचे अनेक वर्ष चेअरमन पदीही त्यांच्याकडे होते.भेरे यांचा राजकारणा बरोबर समाजकारणात देखील त्यांचा विशेष सहभाग दिसून येत असे त्यांचे विविध समजातील लोकांशी कायम ऋणानुबंध राहिले यामुळे त्यांना मानणारे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर होते.त्यांच्या त्यांच्या मृत्यूमुळे वासिंद परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दिवंगत विठ्ठल भेरे यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, मुलगा रवींद्र ,राजेंद्र, एक मुलगी, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शनिवारी सकाळी ११ वाजता वासिंद येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी चे माजी आमदार रुपेश म्हात्रे, भाजपाचे दशरथ तीवरे यांसह वासिंद,व शहापूर तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रासह विविध राजकीय पक्षाचे पुढारी, व वासिंद परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.