ठाणे दि २ : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीत राबविण्यात आलेल्या “लस महोत्सवामध्ये (Vaccination Festival )आज एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल १० हजार १० कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. एकाच वेळी एकाच केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाचे कौतूक केले आहे
दिव्यातील एसएमजी शाळेचे आवारात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते लस महोत्सवाला सुरुवात झाली. दोन सत्रात करण्यात आलेल्या या लस महोत्सवामध्ये रात्री ९.०० वाजेपर्यंत एकूण १० हजार १० लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज एकाच वेळी १० हजार नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त दिवावासीयांनी समाधान व्यक्त केले. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा “लस महोत्सव पार पडला
या लस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा प्रभागात आरोग्य केंद्र व बसेसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे परंतु देशात पहिल्यांदाच एकाच वेळी सुमारे १० हजार लसीकरण महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. दिव्याच्या विकासासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन सदैव कटिबद्ध असून नागरिकांचे लसीकरण देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा भव्य लसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून राज्यात मुंबई नंतर ठाणे महापालिका कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अव्वल ठरली आहे. आजपर्यंत १४ लाख लसीकरणाचा टप्प्या पूर्ण केला असून कोव्हिड-१९ चा सामना करण्यासाठी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत लस देण्याचं नियोजन केले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले.
५० बेघर व्यक्तींचे केले लसीकरण
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. महापालिकेच्यावतीने समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी रिक्षाचालक महिला व पुरूष, किन्नर, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी विशेष लसीकरण सेंटर्स, घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरी जावून लसीकरण आणि आता शहरातील बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी जावून बेघरांचा शोध घेवून त्यांचे लसीकरण करण्यात आले.
गांधी शास्त्रींच्या जयंतीचा विसर
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबदादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस सकाळी ११ वाजता पुष्पहार व अभिवादन करण्याचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या संदर्भात महापालिकेकडून परिपत्रकही जारी करण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या वतीने दिवा येथे आज लस महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवात राजकीय क्रेडिट घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौरांसह अन्य पदाधिकारी मग्न होते. तसेच या महोत्सवाला महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी दर्शविली. त्यामुळे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या कार्यक्रमाला कोणीही फिरकले नाही. महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचा पदाधिकाऱ्यांना विसर पडला, अशी टीका गटनेते मनोहर डुंबरे यांनी केलीय.