मुंबई, दि. २८ः शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले असताना, असंवेदनशील मुख्यमंत्री तेलंगणाला गेले. सूरत, गोवा असा सगळा चोरटेपणाचा प्रवास करणारे तेलंगणामध्ये जाऊन काय, सांगणार असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकेची झोड उठवली. स्वतःचे घर सांभाळता येत नाही, ते भूरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले. दोन हाप असा उल्लेख करत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड दौऱ्यावर ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला
मंगळवारी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मुंबईत आधीच नियोजन शून्य विकास कामांमुळे प्रदुषणात भर पडली आहे. अशातच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक आदी भागात अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अवकृपेने बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. हातातोंडाशी आलेले केळी, द्राक्षे, कांदे, खरीप पीक मातीमोल झाल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत.असे ठाकरे म्हणाले .
कृषीमंत्र्यांना खोचक चिमटा
कृषीमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी पीक विमा योजनेची अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ती खात्यात जमा न झाल्यास दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा केली. पुढे दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला, परंतु, कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले, मला याची काही माहिती नाही, असा खोचक चिमटा ठाकरेंनी काढला.
पीक विमा योजनेची अग्रीम रक्कमेवरून शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, सरकारमधील मंत्री स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढे दिल्ली वारी करतात, तेवढे शेतकऱ्यांसाठी केले तर बर होईल, असे सांगत ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्यात दुष्काळी स्थिती असताना मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, हा सरकारचा तेरावा महिना आहे. राज्य संकटात असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. सरकारमध्ये राहण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका केली.
मोदी शहावर टीकास्त्र
भाजप इतर राज्यात रेवड्या वाटत फिरत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला ते तोंड कधी दाखवणार? पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री क्रिकेटचा अंतिम सामना पाहायला गेले. परंतु, मनिपूर जळत असताना तिकडे गेले नाहीत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी कधी येणार, असा सवाल ठाकरेंनी करत निवडणुका आल्या की थापा मारणाऱ्या भाजपने थापांचे धूर थांबवून शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला दिला.