मुंबई, दि.७ः शिवसेनेप्रमाणे राष्ट्रावादी कॉंग्रेसबाबत अपेक्षित निकाल आला. चोर न्यायाधीश झाल्याने चोरांना सोडून दिले, अशी बोचरी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर बुधवारी केली. देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपवण्याची कीड लागली आहे. महाराष्ट्रातील ही कीड मारावी लागेल, असा सूचक इशारा ठाकरेंनी दिला.

भाजप आणि राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. सर्वांचे स्वागत करताना ठाकरे म्हणाले की, सेनेत आलात म्हणून कधीही पश्चाताप करावा लागणार नाही अशी ग्वाही मार्गदर्शन करताना दिली. दरम्यान, देशासह राज्यातील राजकीय स्थिती आणि सत्तेच्या कारभारावर सडेतोड भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अपेक्षित होता. आयोगाने तसा निकाल दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या निकालाप्रमाणे हातोडा मारला असता. आता खोटी कागदपत्रे तयार करुन चोर न्यायाधीश झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यादेखत चोरांना सोडून दिले जात आहे. बलात्कारी, खून, दरोडेखोर त्यामुळे मोकाट सुटत आहेत. महाराष्ट्रात या चोर बाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांविरुद्ध असंतोष नव्हे तर भयंकर चिड, संताप आहे, असा हल्लाबोल केला. भाजपमध्ये आता नैतिकता राहिली नसल्याची ठाकरे म्हणाले.

पडत्या काळाच्या विरूध्द भविष्यकाळ चढत असतो. आपण पडलेलो नाही, आपल्यासोबत गद्दारी झाली. गद्दारांना पाडणारच, असा निश्चय ठाकरेंनी केला. कोकणापासून लोकांमध्ये फिरण्यास सुरूवात केली आहे. आता राज्यभर दौरा करणार आहे, अशी माहिती देताच, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले. जोरदार घोषणाबाजीने मातोश्रीचा परिसर त्यांनी यावेळी दणाणून सोडला. घरदारावर, कुटुंबावर निखारे ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. पक्ष वाढवला. आता गुंडागर्दी, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना सतरंज्या उचलायला लावून बाजारबुणगे तुमच्या डोक्यावर बसवले जात असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपचे भाडोत्री हिंदुत्व कोणालाही मान्य नसल्याचा हल्लाबोल केला. प्रादेशिक पक्ष फोडण्याची किड महाराष्ट्रात ठेचणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *