ठामपा आयुक्त सौरव राव यांनी केली पाहणी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार करण्यासाठी मौजे आतकोली येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची पाहणी मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. या क्षेपणभूमी परिसरासभोवतालचे राखीव क्षेत्र (बफर झोन) सुव्यवस्थित ठेवावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.
क्षेपणभूमी परिसराचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आयुक्त राव यांनी या पाहणी दरम्यान स्पष्ट केले. तसेच, क्षेपणभूमीत कचरा येत असताना वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून गाड्यांची ये-जा जलद होईल, याची व्यवस्था करण्यात यावी. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा तातडीने उभ्या केल्या जाव्यात. घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन व्हावे. त्यात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी या पाहणीनंतर दिले.
राज्य शासनाने ठाणे महापालिकेस मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा हस्तांतरित केली आहे. या जागेचा ताबा ठाणे महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची हद्द निश्चिती पूर्ण झाली आहे. या जागेवर घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकात्मिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची जागा, त्याची रचना, घनकचऱ्याची वाहतूक व्यवस्था याची माहिती आयुक्त राव यांनी घेतली.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा) तुषार पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिवा येथील क्षेपणभूमीचा वापर करण्यात येत होता. या क्षेपणभूमीची क्षमता जानेवारी २०२३मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर, डायघर येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्व प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले. मात्र त्या प्रकल्पात काही तांत्रिक बदल करावे लागल्याने हा प्रकल्प तुर्तास बंद आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, भांडार्ली येथे सुरू करण्यात आलेल्या क्षेपणभूमीची क्षमताही मर्यादित आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी नवीन जागेची निकड निर्माण झाल्याने राज्य शासनाकडे जागेची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून मौजे आतकोली येथील जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध झाली आहे. या जागेवर कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊ लागल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.