The Municipal Corporation will stand by special children to make them self-reliant – Thane Commissioner

ठाणे  : व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहिल संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना, त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला, या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटये, दिव्यांग कला केंद्राचे ‍किरण नाक्ती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेव्वा..” या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य, गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला. ‘गणेश वंदना, सत्यम शिवम् सुंदरम, डिपाडी डिपांग.., वाजले की बारा.. अभंग, कोळीगीते’ यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले. या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली. मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!