ठाणे, दि. ३० (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणित व विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळेल. या संदर्भात तातडीने सर्व कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी दिले.
कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित, आशिष झुंझारराव, विज्ञान पदवीधर कृती समितीचे पदाधिकारी उमेश बेंडाळे, मनोहर घरत, मंगेश इसामे, विठ्ठल मराठे, अंकुश माळी, शिवकांत खोडदे आदी उपस्थित होते. या बैठकीत पदोन्नतीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यात महिनाभरात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न तांत्रिक कारणांबरोबर विविध अडचणींमुळे १० वर्षांपासून प्रलंबित होता. जागा रिक्त असूनही शिक्षकांना पदोन्नती मिळत नव्हती. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे १४८ शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला. सोमवारी झालेल्या बैठकीत विज्ञान व गणित पदवीधर शिक्षकांची ३१४ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले. या पदावर सर्व तांत्रिक मुद्दे सोडवून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १३० शिक्षकांना पेसा क्षेत्रात पदोन्नती दिली जाणार आहे. तत्पूर्वी आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर जिल्हा परिषदेने घेतलेल्या पदोन्नतीच्या निर्णयाकडे लक्ष वेधले. त्यानुसार पदोन्नती मिळाल्यानंतरही त्याच ठिकाणी शिक्षक कार्यरत राहणार आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली.