मुंबई, दि. १३ः शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या खासदार, आमदारांना निवडून आणेन, अन्यथा राजीनामा देईन असा छातीठोक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. आता लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे निवडून आणणे सोडा, विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली नाही तर शिंदे राजीनामा देणार का, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा भाजपने दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा सर्वाधिक जागा पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दिल्ली स्तरावरून देखील यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवसेना (ठाकरे) नेते परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. सेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवले नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही. सोबत आलेल्या सर्वच आमदार, खासदारांना मोठ्या संख्याबळाने निवडून आणणार, अन्यथा राजीनामा देईन अशी भीमगर्जना केली होती. परंतु सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेवरून शिंदेंनी खासदारांना निवडून आणणे सोडा, विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवून द्यावी. नाहीतर थेट राजीनामा द्यावा, अशी मागणी परब यांनी केली.
दिवंगत नेते आनंद दिघे यांनी बाळासाहेबांना गळ घालून ठाणे हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. आजवर ही जागा शिवसेनेकडे आहे. सध्या शिंदेंच्या महायुतीत भाजपने या जागेवर दावा ठोकला आहे. शिंदे यांनी जर ठाण्याची जागा भाजपला दिल्यास दिघे यांचा फोटो त्यांनी कार्यालयातून यापुढे काढून टाकावा, असे परब यांनी ठणकावले.
उत्तर- पश्चिम मुंबई मतदार संघातून अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, पक्षात त्यांना काहीच स्थान नाही. निवडणूक लढविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचे परब म्हणाले. गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर आणि भाजपच्या किरीट सोमय्या यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.
महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर थीम पार्क उभारले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे पार्क बनविण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. भाजपने याला विरोध केला आहे. आता पुन्हा थीम पार्क बनवण्यात येत असेल तर त्याला बाळासाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी परब यांनी केली.
लोकसभा निवडणुकीमुळे कधीही आचारसंहिता लागू होईल. या काळात सण येत आहे. तसेच शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येत आहेत. आचारसंहितेचा याला फटका बसू नये, याकरिता लागणाऱ्या परवानगी करता एक खिडकी योजना लागू करावी, जेणेकरून हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्रव्यवहार करणार असल्याचे परब यांनी सांगितले.