हलाल नियंत्रण मंचाची मागणी
मुंबई : भारतातील मांस व इतर सर्व किराणा माल खाद्य पदार्थ निर्यातीकरता ” हलाल” प्रमाणपत्राची खाजगी आयात निर्यात दलालामार्फत सक्ती करण्यात येत आहे. सरकारचा अंकुश नसल्याने हलाल प्रमाणपत्र काही खाजगी यंत्रणा मार्फत देणे सुरू आहे. त्यामुळे खाजगी यंत्रणांचा बोगस मनमानी कारभार सुरू असून आर्थिक लुटमार सुरू आहे. त्यामुळे सरकारने हा मनमानी कारभार थांबवावा व भारतातील उत्पादकांची आर्थिक लूट थांबवावी.अशी मागणी हलाल नियंत्रण मंच या संस्थेने शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
हलाल प्रमाणपत्र असेल तर भारतातील खाद्य उत्पादित वस्तू इतर देशातील दुकानदार विक्री करणार असे आदेश काही देशातील खाजगी दलालांनी काढले आहेत. त्यामुळे हलाल प्रमाणपत्याबाबत विचारपूर्वक निर्णय सरकारने घ्यावा. खाजगी दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी संस्थेचे पदाधिकारी इंद्रजीत कौर , श्याम बेंद्रे यांनी यावेळी केली.
इस्लामी देशांनाच हलाल मांसाची गरज असते. भारतातून सर्वात जास्त मांस निर्यात व्हिएतनाम व त्यानंतर थायलंड देशात होते. दोन्ही देश इस्लामी नाहीत. त्यामुळे हिंदू संघटनांनी वरील बाब सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर हलाल प्रमाणपत्राची अट सरकारने काढून टाकलेली आहे. मात्र मुस्लिम देश कोणतीही वस्तू आयात करताना, त्यावर हलाल प्रमाणपत्र असेल तरच ती वस्तू ते देश भारतातील उत्पादने आयात करत आहेत. हे कोणत्याही कायद्याला धरून नाही असे संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदर सिक्का यांनी यावेळी सांगितले.
त्या आयात वस्तूंमध्ये मांसाच्या बरोबरच इतर सर्व बाबी चॉकलेट, बिस्किटे, तेल, सौंदर्यप्रसाधने, औषधे वगैरे हलाल प्रमाणपत्र असेल तरच आम्ही घेणार अशी जबरदस्ती काही देश करत आहेत.
जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट , हलाल कौंसिल ऑफ इंडिया , जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र , हलाल इंडिया प्रा. लि. , ग्लोबल इस्लामिक शरिया सर्व्हिसेस , हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या संस्था हलाल प्रमाणपत्र देत आहेत. यांना कोणत्याही प्रकारची शासकीय अनुमती नाही. या संस्था हलाल प्रमाणपत्र नोंदणीकरिता साठ हजार रुपये घेतात. तर नुतनीकरणासाठी रुपये विस हजार रुपये घेतात.
गंभीर बाब म्हणजे जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट ही संस्था बॉम्बस्फोटातील आरोपींना आतंकवाद्यांना न्यायालयीन खटल्यात सहकार्य करते असा आरोप करत हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणारे धन हे देशद्रोही लोकांच्या मदतीकरिता वापरले जाते असे संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते हरिंदर सिक्का यांनी यावेळी सांगितले.
हलाल नावाच्या या भयावह संकटाची सर्व बिगर इस्लामी व्यक्तींना विशेषत: हिंदूंना जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता मोठया प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे असे हरिंदर सिक्का यावेळी सांगितले.