मुंबई : गुजरातच्या सूरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनवर काल काही समाजकंटकांनी दगडफेक केली. सूरतहून रात्री आठच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती. ट्रेन नंदूरबार येथे पोहोचताच रात्री १०.४५ च्या सुमारास अचानक दगडफेक सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तपासानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना केली. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
या प्रकरणी जीआरपीने सांगितले की, अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री ८ वाजता निघाली होती. एकूण १,३४० प्रवासी या ट्रेनमध्ये होते. ट्रेनमधील प्रवासी जेवल्यानंतर भजन करून झोपणार होते. पावणेअकराच्या सुमारास ट्रेन नंदूरबार येथे पोहोचली. इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरू झाली. प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे, अनेक बाजूंनी दगड येत होते. अनेकजण दगडफेक करत असल्याचा संशय आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले. त्यांनी लगेच दरवाजे, खिडक्या बंद केल्या. मात्र, तरीही काही दगड ट्रेनच्या आत पडले.