बदनाम शिवसेना, आणि भाजपचा विलंब ?
एसटी कर्मचा-यांच्या संपाचा आज चौथा दिवस
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. परिवहन मंत्रांचे वादग्रस्त वक्तव्य आणि शिवसेना पक्षप्रमुखांचा कानाडोळा या सगळया पार्श्वभूमीवर संपामुळे शिवसेना बदनाम होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपला आयतीच संधी मिळालीय. त्यामुळे संपावर तोडगा काढण्यास विलंब लावत आहे का ? असा सूर लावला जात आहे. मात्र शिवसेना भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. शनिवारी भाऊबीज सण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्या दिवशी तरी हस्तक्षेप करून संप मिटवतील का ? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे
सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीत राज्यातील लाखो एसटी कर्मचा-यांनी संपाचे निशान फडकवलं आहे. राज्यातील सर्वच बस आगारातून एकही एसटी बाहेर पडली नसल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणा- या प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. त्यांना खासगी वाहनाशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र खासगी वाहनचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याने मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड असा दुहेरी सामना प्रवाशांना करावा लागत आहे. बाराही महिने गजबजलेले बसस्थानकही ओसाड पडली आहेत. तर दुसरीकडे प्रशासन विरूध्द एसटी कर्मचारी असा संघर्ष सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचा-यांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २५ वर्षे वेतनवाढ मिळू शकत नाही असे वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे परिवहन मंत्रयाविषयी कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर आहे. परिवहन मंत्रयानाही संपावर तोडगा काढण्यात अजूनही यश आलेलं नाही. परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे. सरकारविरोधातील आंदोलनात नेहमीच अग्रेसर असणारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सुध्दा एसटीच्या संपाविषयी मौन बाळगून का आहेत, असा सवाल एसटी कर्मचा-यांकडून विचारला जातोय. त्यामुळे दुसरीकडे शिवसेनेविरोधातही कर्मचा-यांची नाराजी खूपच वाढत चालली आहे. संपामुळे शिवसेना बदनाम होत असल्याने भाजपने ही हेच टाइमिंग साधल्याच बोललं जातय. त्यामुळेच संप मिटविण्यात विलंब लावला जातोय का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस चौथ्या दिवशी तरी हस्तक्षेप करून संप मिटवतील का? याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
—–
उध्दव ठाकरेंचा सबुरीचा सल्ला
एसटी संपाबाबत एसटी कर्मचारी सचिन आगे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधल्याची ऑडीओ व्हायरल झाली आहे. आमचा विश्वास रावतेंसाहेबांवर नाही तर तुमच्यावर आहे तुम्ही काही तरी तोडगा काढा अशी विनवणी आगे यांनी उध्दव ठाकरेंकडे केलीय. त्यावर उध्दव ठाकरेंनी काही तरी तोडगा काढू पण तुम्ही धीर धरा, असा सबुरीचा सल्ला दिलाय. परिवहन मंत्री रावतेंचीही तक्रार उध्दव ठाकरेंकडे करण्यात आलीय. रावतेसाहेबांनी कर्मचा-यांना जेलमध्ये पाठवू असे वक्तव्य केलयं. मात्र तसे होऊ देणार नाही. रावतेंना मी काय बोलायचे ते बोललोय असही उध्दव ठाकरेंनी संभाषणात म्हटलय.