सत्तेतून बाहेर पडण्याची शिवसेनेची पून्हा धमकी
राणेंच्या अटकावासाठी सेनेचे दबावाचे राजकारण
मुंबई : राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या शिवसेनेने भाजपला अनेकवेळा दिल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या धमक्या केवळ पेाकळ ठरल्या. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची बैठक सोमवारी मातोश्रीत पार पडली. आमदारांची कामे होत नसल्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याची चर्चा बैठकीत झाल्याचे समजते. नारायण राणे हे भाजपच्या वाटयावर असल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यामुळे राणेंच्या भाजप एन्ट्रीला खीळ बसावी यासाठी शिवसेनेचे पून्हा दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेनेच्या मंत्रयाना अधिकार नसल्याने आमदारांची विकास कामे होत नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. विकास कामं होत नसतील तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुमची मानसिकता आहे का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी आमदारांना केली. त्यावेळी आमदारांनी तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल असे सांगितल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. मातोश्रीवर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर पडू नये यासाठी नेतेमंडळींच्या मोबाईल आणि लॅपटॉपवर बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांच्या पीएंना सुध्दा मातोश्रीवर प्रवेश नव्हता. नारायण राणे हे दस-यापूर्वी भाजपात प्रवेश करणार आहेत तसेच नवरात्रीनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंचा सोंगडया म्हणून उल्लेख केला. या सगळया पार्श्वभूमीवर शिवसेनेत नाराजी व अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दबावाचे राजकारण सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महागाई विरोधात रस्त्यात उतरणार
महाराष्ट्रात महागाई वाढली आहे , प्रचंड नाराजी आहे या नाराजीचा फटका सेनेला बसू नये यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला , सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा , सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.