मुंबई : शासनाने शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाला ३४ रुपये भाव निश्चित केला असला तरी सहकारी संघ आणि खाजगी कंपन्या ३४ रुपये भाव देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सरकारने याप्रकरणी गांभिर्याने लक्ष देत शेतकऱ्यांचा अन्याय दूर करावा नाही तर आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल असा इशारा शिवधर्म फाऊंडेशन चे अध्यक्ष दिपक आण्णा सीताराम काटे यांनी सरकारला दिला आहे.
पशुखाद्याचे भाव २५ टक्के कमी करण्यात यावे , सर्व सहकारी व खाजगी दूध संस्था यांचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दरमहा आलेल्या दुधाचे ऑडिट करून शेतकऱ्यांचे दूध संकलन किती आहे व दूध पिशवी प्रॉडक्ट यांची विक्री किती आहे यांची दरमहा माहिती सार्वजनिक जाहीर करण्यात यावी , ज्या खाजगी व सहकारी संस्थांनी गेल्या तीन महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव दिला आहे अशा सर्व संस्थावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
पशु औषधे खाद्य व जीएसटी मधून मुक्त करण्यात यावी , दुधाच्या संदर्भात सरकार व नेते यांच्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे , जनावरास विमा कवच योजना उपलब्ध करून प्रत्येक गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे.अशी मागणी करण्यात आली आहे.