मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात वातावरण तापलं आहे. मुंब्रा शहरातील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात पोहचले आहेत. तर दुसरीकडे जी शाखा पाडण्यात आली ती शाखा आपलीच होती, असा दावा शिंदे गटाने केला आहे. या सगळया पार्श्वभूमीवर ठाकरे व शिंदे गट आमने सामने आल्याने शहरातील वातावरण तापलं आहे.
उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावले होते. पण रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन काही लोकांनी ते बॅनर फाडले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात शाखा परिसरात येण्यास मनाई केल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात कलम १४४ ची पाठवलेली नोटीस रद्द केल्याची माहिती समोर आली. मात्र संध्याकाळ पाच वाजता उद्धव ठाकरे यांचा ताफा मु्ंब्रयात पोहचला आहे त्यावेळी शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मुंब्र्यात येऊन काय बोलतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. “मी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच अभिनंदन करतो की त्यांनी 144 ची नोटीस मागे घेतली. माजी मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत 144 ची नोटीस कोणी दिली आहे का ? पोलीस मुंब्र्यामध्ये घबराटीच वातावरण तयार करत आहेत. उद्धव ठाकरे हे मुंब्रामध्ये आले असते आणि गेले असते. पण यांनी गेल्या 12 तासांपासून हा मुद्दा मोठा केला आहे. काही गरज नसताना हा मुद्दा मोठा केला आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाच्या शिवसैनिकही मोठया प्रमाणात जमले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलयाचं दिसून येतय. दरम्यान, मुंब्र्यात आज तब्बल ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. २ नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे. आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.