मुंबई : खरी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सुरू असताना दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता आमने-सामने आले आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचे याचिका दाखल करण्यात आली होती. आता अजित पवार गटानेसुद्धा विधीमंडळाकडे शरद पवार गटातील ११ पैकी दहा आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. यादरम्यान मात्र, त्यांनी शरद पवार गटातील एका आमदारांचे नाव वगळले आहे.
राष्ट्रवादीत सध्या दोन गट निर्माण झाले असून, शरद पवार गट आणि अजित पवार गट. दोन्ही पक्ष एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना आता अजित पवार गटाने विधीमंडळाकडे आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. विधीमंडळाकडे देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करावी, कारण, त्यांनी पक्ष विरोधी कृती केले आहे असे याचिकेत म्हटले आहे.
अजित पवार गटाने विधीमंडळाकडे दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार गटातील विधानसभेतील आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुमन पाटील, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, संदीप क्षिरसागर यांच्यासह विधान परिषदेतील शशिकांत शिंदे, अरुणकाका लाड आणि एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील एका आमदाराचे नाव वगळले आहे. याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नाही. तेव्हा हे नाव वगळल्यानंतर एका आमदाराला अजित पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा रंगत आहे.