मुंबई, दि.1 : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाययोजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम्’ नावाची योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizen ) विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. लवकरच या योजनेची मान्यता आगामी मंत्रीमंडळ बैठकीत घेणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ आयोजित ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.आमदार बाळासाहेब अजबे, सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार,समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरे, हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सामंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण

मुंडे म्हणाले, भारताच्या संविधानाने जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, यासाठी जेष्ठ नागरिक धोरण, 14 जून 2004 रोजी जाहीर केले. या धोरणास महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2013 रोजी सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण म्हणून जाहीर केले.जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व जेष्ठ नागरिकांचे अधिकार यांची समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना जाणीव व्हावी म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील,ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारित केलेला आहे. हा अधिनियम महाराष्ट्र राज्यात दि .१ मार्च, २००९ पासून लागू करण्यात आला असून अधिसूचना दि.३१ मार्च २००९ रोजी जारी करण्यात आली आहे.

वृध्दाश्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार

सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे म्हणाले, अनाथ, निराधार, निराश्रीत जेष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसहय व्हावे तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, राज्यात वृध्दाश्रम ही योजना सुरु केलेली आहे.आजमितीस राज्यात ३२ वृध्दाश्रम अनुदान तत्वावर सुरु आहेत. हया वृध्दाश्रमात प्रवेशित निराधार, निराश्रीत व गरजू जेष्ठ नागरिकांना निवास, अंथरुण – पांघरुण, भोजन व वैद्यकीय सेवा – सुविधा मोफत आहेत. तसेच वृध्दाश्रमामध्ये बाग – बगिचा, वाचनालय, दूरचित्रवाणी वरील कार्यक्रम आदी सुविधा देखील पुरविण्यात येतात.याव्यतिरिक्त मातोश्री वृद्धाश्रम योजनेंतर्गत सेवाभावी संस्थांमार्फत 5 एकर जागेमध्ये 100 व्यक्तींसाठी एक असे 23 वृद्धाश्रम राज्यात सुरू आहेत. याव्यतिरिक्त श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना तसेच एस टी बस प्रवासदरात सवलत अशा आणखी काही योजना देखील राबविल्या जातात असेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

टाळेबंदी कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय

मागील दोन वर्षात कोविडच्या लॉकडाऊन काळात श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थींना राज्य सरकारने तीन तीन महिन्यांचे मानधन एकत्रित ऍडव्हान्स देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. लॉकडाऊन काळात प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांसाठी 24 तास कार्यरत मदत कक्ष स्थापन करून हजारो ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे निराधार आदींना विविध प्रकारची मदत व दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत मिळावी म्हणूनही हेल्पलाईन आहे असेही मुंडे सांगितले.

़़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!