मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सुरक्षा दल आणखी सक्षम करण्यात येणार असून, त्यासाठी सुरक्षा दलातील सर्वच कर्मचा-यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५७ वा वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाला ५७ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण सभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते आज भांडुप (पश्चिम) परिसरातील खिंडीपाडा मार्गावर असणा-या सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्र.) अजित तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.संजीवकुमार पुढे म्हणाले की, सुरक्षा विभाग हा महानगरपालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण व सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. सुरक्षा दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, सुरक्षा दलातील कर्मचा-यांना अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासह भरती प्रक्रिया राबविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सकारात्मक प्रयत्न करित आहे.
यामुळे महानगरपालिकेचे सुरक्षा दल हे अधिक सक्षम व सामर्थ्यशाली होण्यास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध स्तरावरील पारितोषिक पटकावल्याबदल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.