नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रेय होसबाळे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. २०२७ पर्यंत ते या पदावर राहणार आहेत. होसबाळे यांची २०२१ मध्येही या पदावर निवड झाली होती. नागपुरात सुरू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी ही निवड करण्यात आली.
कर्नाटकातील शिमोगा इथे राहणारे दत्तात्रेय होसबाळे हे १९६८ पासून संघाचे स्वयंसेवक आहेत. १९७२ साली त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य सुरू केले. अभाविप मध्ये कर्नाटकचे प्रदेश संघटन मंत्री ते राष्ट्रीय संघटन मंत्री पदापर्यंत त्यांनी जबाबदारी पाहिली. २००२ मध्ये संघाच्या सह बौद्धिक प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली. २००९ साली त्यांनी संघाच्या सह सरकार्यवाह पदाची जबाबदारी स्विकारली. २०२१ साली त्यांची रकार्यवाह पदावर निवड झाली. ही निवड तीन वर्षांसाठी असते.