मुंबई, 26 फेब्रुवारी : पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘नूतनीकृत अकादमी संकुलाचा’ उद्घाटन समारंभ शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी, सकाळी ११:३० वा. आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग असलेल्या रवींद्र नाट्यमंदिर, लघु नाट्यगृह आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री शमंगल प्रभात लोढा , सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे सुद्धा उपस्थित असतील. त्याचबरोबर कला क्षेत्रातील दिग्गजांची सुद्धा उपस्थिती सदर सोहळ्यास लाभणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप, रोहन पाटील सादरीकरण करणार आहेत.
असे असेल रवींद्र नाट्य मंदिराचे नवे स्वरूप!
नाट्यगृहाच्या जुन्या इमारतीत आधुनिक सुविधा देत नवीन अंतर्गत सजावट व तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अधिक आरामदायक खुर्च्या, प्रगत ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजना आणि सर्व सोयी सुविधांनीयुक्त रंगपट आले आहेत. अत्याधुनिक परिषद सभागृह, खुले नाट्यगृह, नॅनो सभागृह, ऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्स नव्याने उभारण्यात आले आहेत. लघु नाट्यगृहात डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणा,चित्रपट प्रदर्शन व्यवस्था, करण्यात आली असून अकादमीत वादन कक्ष आणि सृजनकक्षही विकसित करण्यात आले आहेत. तसेच पु. ल. देशपांडे यांचे स्मृतिदालन देखील सुरु करण्यात येणार आहे.
या सुधारित सुविधांमुळे कलाकारांना अधिक प्रेरणादायी आणि सुसज्ज वातावरण मिळेल. प्रेक्षकांचा अनुभव अधिक दर्जेदार व आनंददायक होईल. विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन सहज शक्य होईल. निर्मिती आणि प्रयोगशीलतेला चालना मिळेल, ज्यामुळे नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपल्या कलेचा विकास करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. विचारमंथन, प्रशिक्षण आणि सादरीकरणासाठी एक आदर्श मंच निर्माण होईल, जो कला क्षेत्राच्या प्रगतीस मोठा हातभार लावेल.
पु. ल. आता बंगालीत!
रवींद्र नाट्यमंदिर येथे नूतनीकरणानंतर प्रथमच १ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय पु. ल. महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध भाषांत पु. ल. देशपांडे यांचे साहित्य प्रसारित व्हावे, या उद्देशाने सदर महोत्सवात बंगाली भाषेत ‘आमार देखा किचू नमुना’ हे नाटक सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या अतिशय लोकप्रिय ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित हा नाट्याविष्कार रुपांगगण फाउंडेशन सादर करणार असून प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरेल. तसेच या दिवशी पार्थ थिएटर्स, मुंबई तर्फे पु. ल. देशपांडे यांनी लिहलेले ‘मॅड सखाराम’ हे नाटक सुद्धा सादर केले जाणार आहे.
दि. २ मार्च रोजी येथे ‘महिला कला महोत्सव’ आयोजित केला जाणार असून, या कार्यक्रमात लावणी आणि शास्त्रीय युगलगायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेश्मा मुसळेकर आणि संच मिळून लावणी नृत्य कार्यक्रम सादर करतील आणि विदुषी अपूर्व गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांचे शास्त्रीय गायन प्रेक्षकांना ऐकण्यास मिळेल.
प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.