शेतकरी कर्जमाफी निव्वळ मुर्ख बनवण्याचे काम : अच्छे दिनाचा फुगा लवकरच फुटणार :

राज ठाकरे यांची भाजपवर प्रखर टीका

डोंबिवली : सरकारकडे पैसे नसतानाही नुसते योजना जाहीर करत आहे. शेतकरी कर्जमाफी देखील निव्वळ मुर्ख बनवण्याचे काम आहे. सरकारचा हा खोटपणाचा फुगा लवकरच फुटणार आहे असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला.

राज हे कल्याण डोंबिवलीच्या दौ-यावर आले आहेत त्याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.  जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ? असा सवाल राज यांनी केला. कॉंग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधींसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयामध्ये राहुल गांधींचा वाटा 50 टक्के होता असे उत्तर दिले. भाजपला टीका सहन होत नाही. भाजपावर टीका होत असल्याने मुस्कटदाबी सुरु आहे असे ते म्हणाले. गुजरातमध्ये काँग्रेसला पाठिंबा वाढतोय असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. गुजरातमध्ये भाजपाने 150 हून अधिक जागा जिंकल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल असेही राज म्हणाले.  सत्ताधा-यांवरचा लोकांचा विश्वास संपलाय.  निवडणुकीच्या तोंडावर मत घ्यायला यांना हिंदुत्व आठवते. बाहेरुन येणा-या परप्रांतीयांच्या लोंढयांना मतदानाचा अधिकार मिळतो मात्र नियमित कर भरणा-यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही असे राज म्हणाले. मनसेमुळेच मुंबईतील रेल्वे स्टेशन्सनी मोकळा श्वास घेतला.फेरीवाल्यांना हटवण प्रशासनाची जबाबदारी नाही का? जे प्रश्न प्रशासनाला विचारायचे ते तुम्ही मला विचारता, दुसरे पक्ष काही करत नाहीत त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत का? असा प्रतिसवाल राज यांनी पत्रकारांना केला.फेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटीचा हप्ता मिळत असल्याचा आरोपही राज यांनी केला. वांद्रयातील आगी विषयी बोलताना ते म्हणाले की झोपडपट्टींना आगी लावल्या जात आहेत. कच्ची बांधकामे पक्की बांधकामे करण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. झोपडपट्टयांमध्ये परप्रांतियांचे लोंढे वाढले आहेत.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *