मुंबई : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा अखेरच्या दिशेने वाटचाल करीत असून, या यात्रेचा समारोप १७ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. त्यामुळे या यात्रेच्या समारोपाच्या तयारीसाठी मुंबईतील काँगेस नेत्यांकडून जययत तयारी सुरू आहे.
भारत जोडो न्याय यात्रा या वर्षी १४ जानेवारीला मणिपूरमधून सुरू झाली आणि सध्या ती गुजरातमध्ये आहे. काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, १७ मार्चला यात्रेचा समारोप होणार असून, संध्याकाळी मुंबईत मोठी रॅली होणार आहे. या रॅलीसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठवत आहेत. या रॅलीत ‘इंडिया’ आघाडीचे नेते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा वेणुगोपाल यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेने होईल. या रॅलीमध्ये पक्ष आगामी लोकसभेसाठी प्रचार करणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे (MVA) नेतेही सहभागी होणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.