नांदेड, देगलूर , दि. 7 नोव्हेंबर : कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४ दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. देगलूर येथील कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींवरही टीका
राहुल गांधी यांनी देगलूर येथे जमलेल्या हजारो जनसमुदाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करत आहे ही अभिमानाची बाब आहे. देशात आज ज्वलंत समस्या आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. 400 रुपयांचा गॅस सिलेंडर 1100 रुपये झाला, पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत.

हजारो मशालीसह पदयात्रा
देगलूर येथून राहुल गांधी गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी, वन्नाळी कडे पायी निघाले यावेळी जवळपास चार हजार मशालींसह हजारो भारतयात्री ही पदयात्रेने वन्नाळीपर्यंत गेले. यात्रेचा आजचा मुक्काम देगलूर येथे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!