भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

सोल- भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत तिच्यासमोर जपानची नोझोमी ओकुहारा आहे. या ‘फायनल’द्वारे सिंधूला जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत शनिवारी सिंधूने सहाव्या सीडेड चीनच्या ही बिंगजिआओवर चुरशीच्या लढतीत २१-१०, १७-२१, २१-१६ अशी मात केली. बीडब्लूएफ क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सिंधूने पहिला गेम सहज जिंकला तरी बिंगजिआओने दुसरा गेम जिंकत वेळीच पुनरागमन केले. तिस-या आणि अंतिम गेममध्ये सिंधूने ७-४ आणि त्यानंतर ९-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आघाडी राखतानाच निर्णायक क्षणी खेळ उंचावत विजयावर शिक्कामोर्तब केले.

चायना सुपरसीरिज प्रीमियर आणि इंडिया ओपन सुपरसीरिज स्पर्धा जिंकणा-या सिंधूला यंदाच्या मोसमातील आणखी एका जेतेपदासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. कोरिया ओपनच्या ‘फायनल’मध्ये तिच्यासमोर जगज्जेती जपानच्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान आहे. तिने दुस-या फेरीत दुस-या सीडेड अकेन यामागुचीला २१-१७, २१-१८ असे सहज गेममध्ये हरवले.

कोरिया ओपनमध्ये सिंधूपेक्षा खालचे म्हणजे आठवे सीडिंग असले तरी महिनाभरापूर्वी ओकुहाराने जागतिक स्पर्धेत सिंधूलाच हरवून सुवर्णपदक जिंकले होते. एकमेकींचा आजवरचा इतिहास पाहिल्यास नोझोमीने सिंधूवर ५-३ अशी आघाडी घेतली आहे. कोरिया ओपनच्या निमित्ताने तिस-यांदा दोघी आमनेसामने येताहेत. सिंधू यावेळी नोझोमीला हरवून जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेईल का, याची क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *