पुणे :  पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातप्रकरणी कोणालाही सोडलं जाणार नाही, पोलीस पुन्हा वरच्या कोर्टात जातील ​ अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस   यांनी आज अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली. तसेच, याप्रकरणी कुठलीही हयगय किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.    पुणे पोलीस  आयुक्तांनी गंभीरतेने घेतल्याचं सांगत याप्रकरणी पबचालक व आरोपी वेंदात अग्रवालचे वडिल विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे.


फडणवीस म्हणाले  ”लोकांमध्ये या घटनेचा संताप व नाराजी आहे. मी पोलिसांसोबत याबाबत बैठक घेऊन सर्वच बाबतीत चर्चा केली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अहवाल ज्युवेनाईल जस्टीस बोर्डकडे दिला आहे. त्यामध्ये, 304 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षे 8 महिन्यांचा हा मुलगा असल्याने ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने आरोपीला जामीन मंजूर केला.  मात्र, निर्भया हत्याकांडनंतर बाल हक्क मंडळामध्ये जे बदल करण्यात आले आहेत, त्यानुसार 16 वर्षांपेक्षा अधिक वयाचा मुलगा असल्यास त्यास प्रौढ म्हणून ट्रीट केलं पाहिजे. त्यानुसार, पोलिसांनी बाल हक्क मंडळापुढे तसा अहवालही दिला होता. मात्र, ज्युवेनाईल जस्टीस बोर्डने तो आदेश सीन अँड साईटप्रमाणे बाजुला ठेवल्याने आरोपीस जामीन मिळाल्याचे फडणवीसांनी सांगितले.​ 

विशेष म्हणजे पोलिसांसाठी देखील हा धक्का होता. कारण, पोलिसांनी याप्रकरणात सगळे पुरावे दिले आहेत, तत्काळ वरच्या कोर्टात अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, वरच्या कोर्टाने सर्वप्रथम ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाकडे जाण्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे, आम्ही बाल हक्क मंडळाकडे पुन्हा अर्ज दाखल करत आहोत, जर बाल हक्क मंडळाने गंभीर गुन्हा समजून ऑर्डर दिली नाही, तर पोलीस वरच्या कोर्टात जातील, अशा शब्दात फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली  

  पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी कारचालक वेंदात अग्रवाल यास पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर, त्यास पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं. मात्र, केवळ 15 तासांतच आरोपी वेदांतला जामीन मिळाल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी कारचालकास पिझ्झा व बर्गर आणून दिल्याचंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्यामुळे, या घटनेनवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.​ 

पुण्यातील कोझी अॅड ब्लॅक पबमध्ये बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा गेला होता. याच बारमध्ये त्याला दारू सर्व्ह करण्यात आली होती. पोलिसांच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज याच बारमधील आहेत. आता, या बारमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात हा बार आहे. 17 वर्षाच्या मुलाला या बार मध्ये एन्ट्री कशी दिली?, बारमध्ये आयडी चेक केले नव्हते का?, असे प्रश्न उपस्थित केले जात असून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी बारमालकासही अटक करण्यात आली आहे.​ 

मुख्यमंत्र्यांनीही दिले निर्देश​
पुण्यातील तरुणाई एकत्र येत अपघाताच्या घटनेचा आणि पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवत आहे. समाजातील विविध क्षेत्रातून ती​व्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकार गंभीर झालं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यानंतर, आज पुणे पोलीस आयुक्तालयात भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणी राजकीय दबाव न झुगारता कारवाई करा, असे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत.

​ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!