मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, राज्यात अजूनही उमेदवारी निश्चितीचा घोळ सुरु असतानाच महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरला आहे. १५ फेब्रुवारी रोजी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या उमेदवारांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली आहे.
दुसरीकडे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर आजही शिक्कामोर्तब झालं नाही. एका राज्यसभेच्या जागेसाठी १० जण इच्छुक असल्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत उमेदवारी अर्जावर आज केवळ सूचक म्हणून आठ आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. उद्या पुन्हा एकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे. अजित पवार गटातून राज्यसभेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आनंद परांजपे अविनाश अदिक, इद्रिस नायकवडी, माजी मंत्री नवाब मलिक तसेच नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्यासह आणखी ३ जण इच्छूक आहेत.
मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश येणार नसल्याने क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपने खेळी सुरु केल्याची चर्चा आहे. भाजप प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना काही आमदारांनी समर्थन दिल्याने अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणे आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला ४०.९ चा कोठा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. मात्र, तसे होणार का? याकडे लक्ष असेल. सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!