डोंबिवली केमिस्ट असोसिएशन आंदोलनाच्या पावित्र्यात
डोंबिवली : औषधाच्या दुकानात घुसून मालकाला धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या अतिरेकी कारवाईबद्दल औषध दुकानदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली केमिस्ट असोसिएशने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून उद्या सोमवारी सकाळी डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारण्यात येणार आहे.
या संदर्भात डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार डोंबिवलीतील औषध दुकानामध्ये पोलिस रात्री घुसतात. आईस्क्रीम विकतात असे कारण देत दुकान 10.30 वाजता बंद करण्यासाठी दुकानात शिरून दहशत निर्माण करतात. या संदर्भात डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
सोमवारी असंख्य केमिस्ट बांधव सकाळी 11.30 वाजता डोंबिवली पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित पोलिसांच्या विरोधात निवेदन सादर करणार आहेत. आमदार राजेश मोरे, माजी आमदार तथा अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे हे देखील उपस्थिती राहणार आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर औषधांची दुकाने बंद आंदोलन करण्याचा इशारा डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव संजू भोळे, कोषाध्यक्ष रेवा गोमतिवाल यांनी दिला आहे.
शिवमंदिर रोडला असलेल्या केमिस्ट दुकानात शिरून दुकान मालकाला खेचून पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले. रात्री 10.30 नंतर दुकान का सुरू ठेवले ? आईस्क्रीम का विकतो ? असा सवाल करत 10.34 वाजता दुकानात प्रवेश करणे आणि दहशत निर्माण करणे या पोलिसांच्या कृती विरोधात डोंबिवली केमिस्ट असोसिएशन आंदोलन करणार आहे. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. केमिस्ट बांधवांनी अन्याया विरोधात प्रदर्शन करण्यासाठी सोमवारी सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आले आहे.