रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न केल्याबद्दल पेटीएम कडून दिल्या जाणाऱ्या पेटिएम पेमेंट्स बँकेच्या अनेक सेवांवर बंधने
नवी दिल्ली : देशात मोबाईलद्वारे पैसे देण्याची सेवा देणाऱ्या पेटिएम या कंपनीवर झालेल्या आरोपांच्या संदर्भात आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी सुरु केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक या बँकिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवहारांवरही बंधने आणली असून या कंपनीकडून केल्या गेलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या आधी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न केल्याबद्दल पेटीएम कडून दिल्या जाणाऱ्या पेटिएम पेमेंट्स बँकेच्या अनेक सेवांवर बंधने आणली होती. आजपासून चौकशी सुरु केल्यानंतर पेटिएम कंपनीच्या शेअरच्या किंमतीतही मोठी घट दिसून आली आहे. त्यांचे शेअर दहा टक्क्यांपेक्षा अधिक टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. ३१ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटिएम पेमेंटस बँकेच्या अनेक सेवा २९ फेब्रुवारी पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेने पेटिएमच्या ग्राहक खाते, प्रिपेड सेवा वॉलेट आणि फास्टटॅग सेवा किवा इतर सेवांमध्ये टॉप अप न स्विकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर पेटीएमच्या व्यवहारासंदर्भात अनेक प्रश्नचिन्हे उभी होती. त्या संदर्भात आजपासून ईडीने चौकशी सुरु केली आहे. या आधी एका पॅनकार्ड वर १ हजार पेटीएम ग्राहकांची नोंदणी केल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले होते. पेटीएम ही कंपनी मुकेश अंबानी विकत घेणार असल्याच्या काही बातम्याही विविध माध्यमांवर आलेल्या आहेत.