अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने करायला हवा : अॅड आशिष शेलार
पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकारांचा सन्मान
मुंबई : देशात प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आपल्या या स्वातंत्र्याचा प्रत्येकाने अतिशय समजदारीने व जबाबदारीनेच वापर करायला हवा अन्यथा काय आणि कसे विपरित घडू शकते याचा अनुभव आपण गेले चार दिवस भीमा कोरेगावच्या दंगलीने अनुभवत आहेत असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार अॅड. अशिष शेलार यांनी महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक संघाच्या सतराव्या पुरस्कार समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना केले. यावेळी संघाच्यावतीने ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार तथा ‘ मार्मिक ‘ साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, ज्येष्ठ पत्रकार व नाटककार विजय घोरपडे यांना पत्रकार भूषण तर वृत्तपत्र लेखक व ज्येष्ठ पत्रकार सुभाष महाजन यांना पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अॅड शेलार यांच्या हस्ते सर्वच पुरस्कारप्राप्त मान्यवरांना गौरव करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या डॉ सुरेंद्र गावस्कर सभागृहात संघाच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार, नाटककार विजय घोरपडे होते. तसेच भारतीय कामगार सेनेचे चिटणीस शंकरराव मोरे, जयप्रकाश घुमटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपला मुद्दा विषद करताना शेलार पुढे म्हणाले की बेजबाबदारपणे लिहिण्याचे आंम्ही अनेकदा बळी ठरलो आहोत. आपली चुकीची वा गैरसमजुतीवर आधारलेली दोन वाक्यं व्यक्तिगत तथा सामाजिक पातळीवर किती घातक ठरतात हे आत्तापर्यंत बर्याच घटनांमधून सिध्द झाले आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अन्य कोणाला उपद्रव होऊ नये याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे . यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा सर्रासपणे होणाऱ्या दुरूपयोगाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
समारंभाच्या प्रारंभी श्रीकांत चाळके यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक व आद्य पत्रकार दर्पण ‘ कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्य – कर्तृत्वाचा आढावा घेतला तर महाराष्ट्र मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी संघाच्या कार्याचा गोषवारा देऊन समस्त पाहूणे व समारंभाच्या अध्यक्षाचा परिचय करून दिला .तसेच खऱ्या अर्थाने जयप्रकाश घुमटकर यांनी संस्थेचे आभार मानून या प्रसंगी त्यांची एक दीर्घ कविता सादर केली . भा.का.सेनेचे चिटणीस शंकरराव मोरे यांनी पत्रकार आणि कामगार नेता तथा कामगार यांच्या संबंधी विषयी आपले विचार मांडले विजय घोरपडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘ दर्पण ‘ कार बाळ तथा विष्णूशास्त्री जांभेकर यांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या जीवनातील पत्रकारांना आदर्शवत तथा प्रेरणादायी ठरेल अशी एक घटना सांगितली .पत्रकाराची अवलोकन , संकलन आणि स्मरणशक्ती किती व कशी कुशाग्र असायला हवी याचे प्रबोधन त्यांनी या घटनेतून केले. तसेच संघाचा, संघाच्या 17 वर्षाच्या कार्याचा व अध्यक्ष बिरवटकर यांचा आपल्या भाषणातून गौरव केला . पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पत्रकार , पत्रलेखक, स्तंभलेखक तसेच आपल्या कार्याने समाजात भूषण ठरलेल्या वीस मान्यवरांचा सन्मानचिन्ह स्वरूप पुरस्कार प्रदान करून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यात ग्रामीण भागात कार्य करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता .संघाचे अध्यक्ष बिरवटकर यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली .