१२८ मुलींचे वडील बनलेल्या कथोरेंचा पंकजा मुंडेंकडून गौरव
ठाणे : विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान करून आमदार किसन कथोरे यांनी खऱ्या अर्थाने गरीब आणि दुर्बल महिलांचा संसार सावरला, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध योजना राबवितांना कथोरे यांनी महिलांना सन्मान देणारी केलेली ही कृती निश्चितच आगळीवेगळी आहे अशा शब्दांत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यानी आमदार कथोरे यांचे कौतूक केले.
आमदार किसन कथोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना विधवा महिलांच्या १२८ मुलींचे कन्यादान करण्याचा संकल्प पूर्ण केला होता. त्या मुलीं आणि त्यांच्या पतींचा सत्कार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी बदलापूर गावातील दत्त निवास येथे पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या वडिलांप्रमाणेच किसन कथोरे यांची राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात तळागाळातून झाली आहे. वडिलांप्रमाणेच त्यांना देखील कुठलाही खंबीर राजकीय वारसा नसतांना लोकांची सुख दु:खात सहभागी होऊन अफाट लोकसंग्रह वाढवला आहे. राज्य सरकार महिलांसाठी अनेक चांगल्या योजना राबविते आहे. बचत गटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात यश मिळाले आहे. मी देखील अमेरिकेतील सुखासीन जीवन सोडून आपल्या देशात, राज्यात परतले आणि आता मला चिखलातून फिरताना सुद्धा आनंदच होतो कारण जनकल्याणाची शिकवण मला वडिलांनी दिली असेही त्या म्हणल्या. किसान कथोरे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे या गरिबांची तळमळ समजावून घेणाऱ्या नेत्या असून अगदी मुसळधार पाउस आणि दूरवरचे ठिकाण असतांना देखील त्या आवर्जून अशा चांगल्या सामाजिक कामात उपस्थित राहिल्या त्याबद्धल त्यांचे आभार मानले.