जल मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापनदिन
डोंबिवली : येथील जल मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस रेझींग डे २०२३ या निमित्ताने आणि रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत रविवार ८ जानेवारी २०२३ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्वेतील घरडा कॉलनी शिवमंदिराच्या बाजूला एमएसईबी ऑफीस समोर एमआयडीसी डोंबिवली पूर्व येथून मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण तालुका संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक महेश पाटील, समाजसेवक सुजीत नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी दिली.
सदर स्पर्धा ही आठ गटात होणार असून १ किमी ते ५ किमी पर्यंत स्पर्धक धावणार आहेत. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र रंग देण्यात आला आहे. १ कि.मी. अतंर हे अनुदीप बंगला यू टर्न, २ किमी अंतर उस्मा पंप, ३ कि.मी. अंतर आर. आर. हॉस्पीटल यू टर्न, ४ कि.मी. विजय सेल्स आणि ५ कि.मी. शेलार नाका यू टर्न असा असणार आहे. तसेच विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात येणार आहेत.
तसेच जल मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ११ वाजता श्री सत्यानारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मॅरेथॉनचा आनंद आणि सत्यनारायण महापुजा दर्शनाचा आणि तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सुदाम जाधव यांनी केले आहे.