मुंबई : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा-ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच आता काही मराठा नेत्यांनी ओबीसींची भूमिका मांडणाऱ्या मंत्री छगन भुजबळांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं आहे. त्याला आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजानं मतदान करु नये असं आवाहन केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी हा इशारा दिला आहे.
प्रकाश शेंडगेंनी म्हटलं की, “ओबीसींसाठी लढणाऱ्या भुजबळांना पाडू अशा प्रकारची भाषा जर महाराष्ट्रात सुरु झाली तर मग ओबीसी समाज महाराष्ट्रात ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात तो येतो. त्यामुळं जर छगन भुजबळांना जर तुम्ही पाडलंत तर मग हे सर्व ओबीसी १६० मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत”