मुंबई ः विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा न घेता तो फेटाळल्याने आणि सत्तधाऱ्यांतर्फे मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चेस परवानगी नाकारून तो आवाजी मतदानाने मंजूर केल्याने, सभापती नियमांची पायमल्ली आणि पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज सभात्याग केला. पण आता सभापतींना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या प्रस्तावाची सूचना दाखल केली आहे.
सभापतींच्या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या एकूण १५ सदस्यांपैकी १४ सदस्यांच्या सह्या आहेत. शशिकांत शिंदे यांनी सही केलेली नाही.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपातीपणे व एकांगीपणे सभाागृहाचे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तरी सभापतींना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
उपसभापती निलम गोऱ्हे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत. त्यामुळे महायुतीने त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे साहजिकच होते. पण आता खुद्द सभापतीं विरोधातच विरोधकांनी अविश्वासकदर्शक प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे हा प्रस्तावही आता त्याच मार्गाने जाणार हे निश्चित आहे. पण विरोधकांनी त्यांची नाराजी प्रकट केली आहे.