कर्जत: दि.२७. (राहुल देशमुख) : विविध कारणांनी सध्या गाजत असलेली नेरळ ग्रामपंचायत आता फुटपाथवरील झाकणे तुटल्याने तर काही ठिकाणी झाकणेच गायब झाल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. या तुटलेल्या व गायब झालेल्या झाकणांमुळे पादचाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांना कळवून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच यांना विचारणा केली असता संबंधित कर्मचारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले तक्रार नोंदवा असेही सूचित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ ग्रामपंचायत या न त्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. कधी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत, कधी स्ट्रीट लाईट तर कधी पाणी वेळेवर न येणे तर कधी बाजारपेठेतील फुटपाथवर चालण्यासाठी जागाच शिल्लक न राहणे याबाबत नेरळ ग्रामपंचायत प्रशासन हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे.
नेरळ ब्राह्मणआळी परिसरात नेरळ विद्या विकास मंदिर ही शाळा आहे या शाळेतील शेकडो विद्यार्थी या परिसरातील फुटपाथचा वापर शाळेत जाण्या येण्यासाठी करतात मात्र या फुटपाथवरील गटारांची झाकणे तुटलेली असल्याने या झाकणांमध्ये पाय अडकून विद्यार्थी आणि पादचारी ही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे या रस्त्यावर वाहणांची वर्दळ आणि दुसरीकडे फुटपाथ वरील तुटलेली झाकणे यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या फुटपाथवरील झाकणे बदलावी अशी मागणी होत आहे.
याबाबत नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तक्रार केली असता तक्रारदारालाच परिसरातील तुटलेली झाकणे दाखवा असे सांगण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. तक्रारदाराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सदर फुटपाथ वरील झाकणे दाखवली आणि कर्मचाऱ्याला किती दिवसात झाकणे बसवले जातील असे विचारले असता आमच्याकडे झाकणे शिल्लक नसून ती साहेबांना सांगून मागवावी लागतील किंवा त्यावर कडापे टाकावे लागतील असं सांगण्यात आले. असाच वेळ काढू पणा ग्रामपंचायत प्रशासनाने केला तर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा वेळेत मिळतील का असा सवाल ही उपस्थित होत आहे.