मुंबई : ईडी हा भाजपचा सहकारी पक्ष असल्यासारखा वागत असून, ईडीकडून कधी कारवाई करणार हे भाजप नेत्यांना माहित असते. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार यांनी यावेळी ईडीकडून आतापर्यंत केलेल्या कारवायांची सविस्तर माहिती दिली. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, २००५ते २०२३ या १७ वर्षांच्या काळात दोन सरकारे होती. एक आमचे सरकार म्हणजे यूपीए सरकार होते आणि आत्ताचे सरकार आहे. पण भाजपाच्या म्हणजेच एनडीएच्या काळात ५९०६ केसेस नोंदवल्या गेल्या. यापैकी चौकशी करुन निर्णय लागला अशा फक्त २५ केसेस आहेत. त्यामुळे ईडी ही संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे. भाजपाचे नेते आधीच सांगतात की अमुक नेत्यावर कारवाई होणार आहे आणि तशी ती कारवाई घडते. ईडीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात की भाजपाच्या कार्यालयातून हेच कळत नाही, असा हल्लाबोल शरद पवारांकडून करण्यात आला.