दिवाळीअगोदर ‘ राजकीय फटाके ‘ फुटणार
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या तारखेने नेहमीच हुलकावणी दिली. मात्र आता त्यांच्या प्रवेशाची तारीख जवळपास निश्चित समजली जात आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावरच राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे दिवाळी अगोदरच राजकीय फटाके फुटणार आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नारायण राणे यांना शह दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हयात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. कुडाळमध्ये राणे भाजप प्रवेशाची भूमिका जाहीर करताता का ? समर्थकांशी काय संवाद साधतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांचे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याने राणे संतापले आहेत. चव्हाण यांच्याशी राणे यांचे जमत नाही. अनेकवेळा त्यांनी चव्हाण यांच्यावर तोफ डागली. काही दिवसापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनीही सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनीही चव्हाणांवर हल्ला चढवला होता. मध्यंतरीच्या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा याना भेटण्यासाठी नारायण राणे, नितेश राणे आणि मुख्यमंत्री हे एकाच गाडीतून अहमदाबाद येथे गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेक दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या पसरल्या. मात्र प्रवेशाच्या तारखेने नेहमीच हुलकावणी दिली. सिंधुदुर्गातील काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणे अधिकच संतापले आहेत. नवरात्रीत याचा शेवट करेन असे संकेतही राणे यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिले. त्यामुळे नवरात्रीत राणेंचा सिमोंल्लन निश्चित समजला जात आहे.
दिवाळीनंतर मंत्रीमंडळ विस्तार
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नवरात्री उत्सवानंतर होईल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या मंत्रीमंडळात २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री असे ३९ मंत्री आहेत. काही मंत्रयाच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज आहेत तर काही मंत्रयाकडे एकापेक्षा अधिक महत्वाची खाती आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दस-यापूर्वी सिमोल्लंघन करण्याचे संकेत नारायण राणे यांनी दिले आहेत. त्यामुळे राणेने भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची वर्णी मंत्रीमंडळात लागू शकते असेही बोलले जात आहे.