नवी मुंबई दि. २५ ऑगस्ट २०२४ : राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. राज्याची लूट थांबवून जनहिताची कामे करा अन्यथा तुमची अवस्था श्रीलंका, बांग्लादेशच्या सत्ताधा-यांप्रमाणे होईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे.

नवी मुंबई काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत कऱण्यात आले. त्यानंतर युवक काँग्रेस आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जालन्याचे खा. डॉ. कल्याण काळे, नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, सौ. मंदाकिनी म्हात्रे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र दळवी, अंकुश सोनावणे, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती पूनम पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव आनंद सिंग, रवींद्र सावंत, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नासीर हुसैन, कपिल ढोके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या गुंड माफियांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. आपल्या मूळ पक्षाशी दगा करून फुटीर झालेल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दिली आहे. सगळे पोलीस यांच्या सुरक्षेत व्यस्त आहेत. आमच्या माता भगिणी मुलींचे संरक्षण कोण करणार ? मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नाहीत. बदलापूरची अमानवी घटना, बेलापूरच्या अक्षता म्हात्रे या भगिणीवर अत्याचार करून तिच्या खूनाची घटना अशा घटना राज्याच्या विविध भागात रोज घडत आहेत. पण असंवेदनशील सरकार फक्त कमिशन खाण्यात व्यस्त आहे.  

नवी मुंबईच्या स्वयंघोषित शिल्पकाराकडून नवी मुंबईला ओरबाडून खाण्याचे काम सुरु आहे. इथली नैसर्गिक संपदा, खारफुटी डोंगर टेकड्या साफ करून माफिया तयार झाले आहेत. आता हेच माफिया सत्ताधा-यांच्या आशिर्वादाने राजकारणात आले आहेत. नवी मुंबईत गेल्या चार महिन्यात पन्नासहून अधिक लोकांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत नाही आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर नवी मुंबईत देशातील सर्वात अद्यावत रूग्णालय उभारू. राज्यात आपल्याला परिवर्तन करायचेच आहे. त्यासोबतच नवी मुंबईचा पुढचा महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे यासाठी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!