मुंबई : प्रभू रामाचं बोट धरून नरेंद्र मोदी मंदिरात नेत असल्याचं पोस्टर भाजपने छापलं आहे त्यावरून शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जणू काही नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत. हा भाजपाचा निर्लज्जपणा आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. अशा शब्दात शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी.. आज त्यांना जो इव्हेंट त्यांना करायचा करु द्या.. विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपाने जाहीर केलेत जे प्रभू रामाला हात धरुन मंदिरात नेत आहेत हे तुमचं हिंदुत्व आहे का ? २०२४ नंतर कुणाचं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना समजेल. आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो. तेव्हा आजचे व्हिआयपी कुठे गेले होते ? बाबरी पाडली तेव्हा ही लोकं कुठे होती ? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली.बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं ? बाळासाहेब ठाकरेंनी त्या लढ्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी त्यांची मनगटं आणि छाती पिचली होती. आता आम्हाला सत्तेचा माज दाखवू नका. आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय या लढ्यात उतरलो होतो. ज्यांनी हिंदुत्वाच्या मैदानातून पलायन केलं त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही आम्ही आधीपासून अयोध्येत आहोत, आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ…” असे राऊतांनी स्पष्ट केले.
या चार नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतं
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका युतीतील नेते करत असतात. युतीचे पंतप्रधानपदाचे कणखर उमेदवार, विरोधकांकडे पर्याय दिसत नाही, अशी टिका अजित पवार यांनी केली होती. विरोधकांच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. युतीकडे गेल्या १० वर्षांपासून एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणालेत.
प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा वारसा जपतायत
प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. 24-24 हा त्यांच सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानानं सामिल करून घेऊ. नरेंद्र मोदींचा पराभव झाला नाही. तर सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. बाबासाहेबांचा वारसा ते जपतायत, त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत, असं राऊत म्हणालेत.