सोशल मीडियातून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात महिला आयोगाचे पाऊल

राज्य सरकारला शिफारशी करणार;  पंकजा मुंडे यांच्याकडून गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन

मुंबई – सामाजिक माध्यमांतून (सोशल मीडिया) महिलांच्या विरोधात केल्या जाणारया अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा राज्य सरकारला लवकरच उपयुक्त सूचनांचा समावेश असणारा अहवाल सादर करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

विजया रहाटकर यांनी राज्याच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली. आयोगाच्या अहवालाचा राज्य सरकारचा गांभीर्याने विचार करेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची हमी यावेळी पंकजा मुंडे यांनी दिली.  ‘सामाजिक माध्यमांद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रात काम करणारया  महिला आणि अगदी महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात महिला आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे आयोगाला वाटते. कारण अशाप्रकारच्या जाहीर अवमानकारक टिप्पणीचा त्या महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. म्हणून तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीकडून यासंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सूपूर्द केला जाईल,’ असे रहाटकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *