मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. एकिकडे बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्ष सरसावले आहेत. तर दुसरीकडे भाजपने बंदला विरोध दर्शविला आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्रयाच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. बळीराजाला पाठींबा दर्शविण्यासाठी आणि या घटनेचा निषेध म्हणून ११ ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल. दरम्यान, व्यापारी वर्गात बंदला पाठींबा देण्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून येत आहे.
जनता नक्कीच बंद ला साथ देईल : नवाब मलिक
शेतकऱ्यांविरोधी कृषी कायदे करून केंद्रीय जुलमी सरकार आता शेतकऱ्यांची हत्या करत आहेत. या विरोधात जनता नक्कीच ‘बंद’ला साथ देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. या हत्येमागे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे जनतेने दाखवून दिले तरी त्यावर अजून कारवाई होत नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मलिक यांनी केली. या बंदला राज्यातील जनतेची साथ मिळावी असे आवाहन मलिक यांनी केले आहे.
बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार : एकनाथ शिंदे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार असून महाविकास आघाडीतर्फे निषेध म्हणून उद्याचा बंद यशस्वी करणार आहे. विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेस नेत्यांचे राजभवनसमोर मौनव्रत आंदोलन : नाना पटोले
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंदची हाक दिलीय. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
भाजपकडून बंदला विरोध : अतुल भातखळकर
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय. हे लोक लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा करत आहेत, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केलाय. तसेच जर कुणी पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून मुंबईकरांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला तर भाजपा प्राणपणाने त्याला विरोध करेल, असा इशारा भातखळकरांनी दिलाय
सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते ? : रामदास आठवले
महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडी ची भूमिका चुकीची; सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते ? असा सवाल केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केलाय. लखीमपूर खेरी मधील हिंसाचाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरी तील प्रकार निषेधार्ह दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एस आय टी मार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल असेही आठवले म्हणाले.