ठाणे दि. ४ : ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपुजन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. ठाण्याच्या इतिहासात राज्य सरकारने प्रथमच एवढा निधी ठाणे महापालिकेस दिला आहे. त्याचा व्यवस्थित विनियोग केला जावा. लोकांचा पैसा लोकांसाठीच्या सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. त्या सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात. रस्ते, प्रकल्प यात दर्जा राखला जात नसेल तर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ठाण्यातील धोकादायक इमारती हा आपल्या चिंतेचा विषय आहे. म्हणून त्यावर राज्य सरकारने क्लस्टरची योजना आणली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांनी संक्रमण शिबिरांची भीती बाळगू नये. मोकळ्या जागांवर इमारती बांधून नागरिकांना थेट नवीन घर देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वाचनालयाचे मुख्यमंत्रयांनी कौतूक केले. वाचन संस्कृती वाढवणारा हा उपक्रम पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या गावदेवी मैदानात झाली, ते मैदान सुरक्षित ठेवून तेथे चांगली पार्किंग सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कळवा रुग्णालयातील सुविधांचा ठाणेकरांना फायदा होईल. इलेक्ट्रिक बसेस या ठाणे प्रदूषण मुक्त करण्याची पहिली पायरी आहेत. वागळे इस्टेटमधली वाहतूक बेट तर सेल्फी पॉइंट झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जमीन मिळण्यातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकामुळे मूळ ठाणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि लाखो ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

त्याचवेळी, छत्रपती महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत खड्डेमुक्त ठाणे, कचरा कुंड्यांपासून मुक्ती, शौचालय सुधारणा आणि सौदर्यीकरण ही कामे सुरू झाली आहेत. ३१ मेपर्यंत ठाणे शहरात आणखी बदल दिसतील आणि ठाणेकरांना सुखद अनुभव मिळेल, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन

कोपरी खाडी किनारा विकास प्रकल्प, गावदेवी भूमिगत वाहनतळ, कळवा खाडी किनारा विकास प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज अशा प्रसुतीगृहाचे व वाचनालयाचे उद्घाटन, तसेच ब्लड डोनेशन व्हॅन, नातेवाईकांसाठी रात्र निवारा, अक्षयचैतन्य संस्थेतर्फे रुग्णांसाठीच्या मोफत भोजन कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय, वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ च्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, ३९१ कोटींच्या रस्ता मजबुतीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन, परिवहन सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन सभापती विलास जोशी, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवडे, माजी नगरसेवक आणि नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

GS Brothers
1 BHK अवघ्या 18 लाखात..टिटवाळ्यात स्वतःचे घर आजच बुकिंग करा. संपर्क : उमेश 7021610960 Jagdish – 8169906087

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!