नवी दिल्ली : ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. १६ जूनला १७ व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील. लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्यं जोडली जाणार.महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणं बाकी आहे. बिहार, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका आत्ता जाहीर करणार आहोत.
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील. आमच्यासमोर निवडणुकीची तयारी करताना एकूण चार आव्हानं होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
मतमोजणी – ४ जून