कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये जागा अडविणा-या महिलांवर लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली आहे.

कल्याण- कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये जागा अडविणा-या महिलांवर लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली आहे. जागा अडविणा-या १५ ते २० महिलांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रथम सीएसएमटी स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर ती कल्याण पोलिसांत वर्ग करण्यात येऊन सापळा रचून जीआरपीने ही कारवाई केली आहे.

वेल्हाळ नामक महिला प्रवाशाला बुधवारी ट्रेनमधील जागेवरून काही महिलांनी मारहाण केली होती. त्यानुसार सीएसटी स्थानकात लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. ती तक्रार बुधवारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांनी लोहमार्ग पोलिसांना मारहाण-धक्काबुक्कीची वेळ का आली याचे स्पष्टीकरण दिल्याचे समजते आहे. पण तक्रारदार तक्रार मागे घेण्यास अद्याप तरी तयार नसल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जागेवरून झालेल्या वादातून डोंबिवलीतील महिला प्रवाशांना मारहाण करत, उठविण्याचा प्रकार कल्याण स्थानकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठल्यानंतर तेथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे. चारुमती वेल्हाळ (रा. डोंबिवली) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. चारुमती मुंबईत कामाला आहेत. लोकलमध्ये बसायला जागा मिळावी, यासाठी त्या दररोज सकाळी ८.२१ च्या गाडीने डोंबिवलीहून कल्याण गाठतात. ती लोकल सीएसएमटीकरिता फलाट क्रमांक-५ वरून ८.३६ वाजता सुटते. चारुमती यांनी बुधवारीही ८.२१ च्या लोकलने कल्याण गाठले.

मात्र, सीएसएमटीकरिता ही लोकल ८.४५ वाजता सुटली. यावेळी कल्याण स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या महिलांनी आधीपासून बसून आलेल्या महिलांना उठण्यासाठी जबरदस्ती केली. त्याला विरोध करताच, त्यांना धक्काबुक्की करत पर्स खेचत मारहाण केली. त्यात त्यांना नखं लागली, पर्स तुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सुरेखा माने यांनी दिली. चारुमती यांनी सीएसएमटीला उतरल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथील पोलिसांनी ही तक्रार कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!