कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करणार – आयुक्त पी. वेलारसु
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त पी वेलारसू यांच्याकडे केली. रस्त्यांच्या पाच वर्षातील निकृष्ट कामांची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
कल्याण डोंबिवली येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांना ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यामुळे होणारे अपघात याची गंभीर दखल घेत मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांची भेट घेतली. कल्याणाती चक्की नाका ते नेवाळी या मलंगगड भागातील रस्त्याचे काम रखडले असून कल्याण येथील संतोषी माता रोड निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यातच खराब झालेल्या रस्त्यांचे फोटो त्यांनी आयुक्तांसमोर सादर केले. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांबाबत अधिकारी आयुक्तांना अंधारात ठेवत असल्याची बाब शिंदे यांनी यावेळी मांडली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने १२ कोटींचे बजेट मंजूर केले आहेत. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरु करावे असे खा.डॉ.शिंदे म्हणाले. रस्त्यांची कामे युध्दपातळीवर सुरू करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे, गटनेता रमेश जाधव, नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, दशरथ घाडीगांवकर, सुशीला माळी, शीतल मंढारी, प्रकाश म्हात्रे, युवासेना अधिकारी योगेश म्हात्रे, मुकेश पाटील तसेच, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते.
————