1. .…. अखेर सलमान कल्याण पोलिसांच्या हाती  

कल्याण (प्रतिनिधी):किरकोळ कारणावरून घरच्यांशी भांडण झाल्याने रागातून घर सोडून निघून गेलेल्या उत्तरप्रदेशातील १४ वर्षीय सलमानचा शोध लावण्यात कल्याणच्या एसीपी स्कॉडला यश आले आहे. पोलिसांच्या तपास कौशल्यामुळे आपल्या मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या कुटुंबाला अखेरीस सलमान सापडल्याने अत्यानंद झाला आहे.

उत्तरप्रदेशातील एका खेडेगावात राहणारा हा १४ वर्षांचा सलमान घरातून पळून मुंबईत आला होता. अचानक आपला मुलगा गायब झाल्याने अपहरणाचा संशय येऊन त्याच्या कुटुंबियांनी तिकडे पोलिसांत तशी तक्रारही दाखल केली. एकीकडे पोलीस तपास करीत असताना दुसरीकडे कुटूंबाचे नातेवाईक आणि ओळखीच्यांकडे देखील चौकशी सुरू होती. त्यांच्या कल्याणातील एका परिचयाच्या व्यक्तीला ही गोष्ट समजली असता त्याने कल्याणच्या एसीपी स्कॉडशी संपर्क साधून याप्रकरणी मदत मागितली.

दरम्यान, सलमानच्या वडीलांना एक फोन कॉल आला आणि सलमानच्या आधारकार्डाची, नंबरची विचारणा केली गेली. त्या फोन कॉलवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि पोलिसांनाही एकच धक्का बसला. हा फोन कॉल कल्याण-डोंबिवली दरम्यान असणाऱ्या ठाकुर्ली परिसरातून आला होता. आधारकार्डची खात्री करण्यासाठी सदर फोन केला गेला होता. पोलिसांनी या फोन करणाऱ्या व्यक्तीचा माग काढला असता एका हॉटेलात काम करण्यासाठी सलमान तेथे येऊन गेल्याची माहिती मिळाली. मात्र सलमान तेथे सापडला नाही. पोलिसांनी तपासाला गती देत शोध सुरु केला असता सलमान मुंबईच्या दादर स्टेशन परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्याचे काम करीत असल्याची माहिती हाती आली. संपूर्ण दादर परिसर पिंजून पोलिसांनी सलमानला शोधून काढले आणि त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.सानप, हवालदार संजय कोळी, पोलीस नाईक गणेश भोईर, गुणवंत देवकर, शिपाई कुशाल जाधव या मोबाईल चोरीविरोधी पथकाने कौशल्याने शोध घेत सलमानला शोधून काढले.

 

One thought on “.. अखेर सलमान कल्याण पोलिसांच्या हाती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!