डोंबिवली : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणा-या प्रियकराला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. २५ हजाराचा दंड न भरल्यास आणखी २ वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी हि शिक्षा ठोठावली आहे.
11 डिसेंबर 2019 रोजी मोहित भोईर याने आपल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून मलंग गड भागात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी मोहित भोईर याला अटक केली होती. प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीला विवाह करण्याचे ठोस आश्वासन दिले व तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर त्याने दोघांचे प्रेमसंबंध असलेले फोटो फेसबुक व सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे संतापलेल्या तरूणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी मोहित भोईर याच्या विरोधात भादंवि कलम 376, 363, 342, 354 (अ) 354 (ब) 354 (ड), 323, 506 सह आयटी ॲक्ट 67 (ए) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला तात्काळ अटक केली होती. चार वर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी निकाल घोषित केला.
आरोपी मोहित भोईर यास सीआरपीसी 235 (2) अन्वये भादंवि कलम 376 (1) करिता 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपये दंड दंड न भरल्यास 2 वर्षे कारावास, कलम 342 मध्ये 6 महिने शिक्षा व 1 हजार रूपये दंड, हा दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा, 323 मध्ये 3 महिने साधी शिक्षा व 500 रूपये दंड, हा दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा, 506 मध्ये 1 वर्षे साधी कैद व 2 हजार दंड दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा, तसेच आयटी ॲक्ट 67 (ए) मध्ये 2 वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड, हा दंड न भरल्यास 6 महिने साधी कारावासाची शिक्षा ठोठावली.सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. रचना भोईर यांनी कामकाज पाहिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, सपोनि पांडूरंग पिठे, तर तत्कालीन तपासी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय धुरी यांच्यासह कोर्ट पैरवी हवा. वाय. जी. तायडे, कोर्ट ड्युटीचे हवा. धनंजय पाटील, वॉरंट ड्युटीचे हवा. ससाणे, समन्स ड्युटीचे पोशि. गरड, रायटर हवा. बोरसे, पोना. बच्छाव यांनी संपूर्ण खटल्याचे कामकाज पाहिले.